दोन्ही आई
सूर्य देव गेला डोंगराआडं,
मन पाखरू तिचं उडं घराकडं.
लगबगा कामं आवरुनं,
घेतला भाराबी बांधून.
डोईवर भारा हातामधी पाटी,
चालली झपाझपा गुरांच्या पाठी.
म्हॅस शेळ्या मेंढरं, चालली निवांत संथ,
परि माय माऊली, घेईना मुळी उसंत.
खट्याळ करडं, जवा मागं रेंगाळलं,
थांबून क्षणभरी, तिनं प्रेमे हाकारीलं.
पुनः भराभरा चालली प्रेमळ माय,
मागे मागे तिच्या निघे, गुणी कपिला गाय.
मायंच्या नजरेम्होरं, तान्हुलं गोजिरं येते,
वासराच्या आठवानं, कपिला मध्येच हंबरते.
तान्हुल्याच्या ओढीनं, दोन्ही माय धाव घेई,
एकीचे निजे पाळण्यात
दुजे बसे गोठ्यात,
वात्सल्यझरा दोघींच्या ठायी,
दोन्ही आई – दोन्ही माई.
सॉ. नि. सु. थोरात.